पूर्वीच्या काळी म्हणे संसार नावाची एक गोष्ट होती. असे कसे म्हणता ती आजही आहे. पण, त्या संसाराची गोष्ट काही औरच होती. हा संसार म्हणजे तुमच्या सारख्या चिमुकल्यांची एक भातुकली. ही भातुकली काय? असा प्रश्न आजच्या पिढीतील कित्येक मुलांना पडत असतो. भातुकली म्हणजे तुमच्या आजी- आजोबांच्या, आई-वडिलांच्या पिढीचे बालपण. मे महिन्याच्या सुट्टीत मांडलेली प्रत्येक घराच्या अंगणात मांडलेली ही भातुकली म्हणजे एकोप्याने मांडलेल्या संसाराचे प्रतीक होती.
लग्नात तयार होणारी नवरी तिच्या लग्नाचा घाट, घरात पाहुणे मंडळी आल्यानंतर केलेला चहा-पानाचा कार्यक्रम अशा वेगवेगळ्या सवयीचे ते प्रतीक होते. तांब्यांच्या आणि पितळेच्या हंडा व कळशी, चिनी माती किंवा प्लास्टिकचा कप-बशीचा सेट, छोटे-छोटे कुकरचे डबे, इवलेसे चमचे, झारे, डाव, छोटासा गॅस आणि सिलिंडर, छोटासा कुकर, छोटी-छोटी पातेली, छोटंसं जातं आणि उरलेली छोटी-छोटी रंगबिरंगी लाकडी भांडी. याशिवाय कोणाकडे फ्रीज तर कोणाकडे पत्र्याचे कपाट या सर्व गोष्टी तुमच्या खेळण्यात कधी आल्यात का? नाही ना?
याचे कारणही तसेच आहे, कारण या भातुकलीची जागा आता बार्बी गर्ल आणि रेसिंग कारने घेतली. मातीच्या भांडय़ापासूनची बनलेली खेळणी खेळण्यात जी मज्जा आहे, ती या रेसिंग कारमध्ये नाही.
No comments:
Post a Comment