Friday, February 22, 2019

प्रस्तावना

 आंधळी कोशिंबीर, डोंगर का पाणी, हतुतु, डबा ऐसपैस, आटय़ापाटय़ा, भोवरा, साखळी साखळी, लपाछपी, विषामृत, काठय़ांचा खेळ.. ही नावं तुम्ही कधी ऐकली आहेत का? नसतील तर ती कसली आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगतो. ही आहेत काही खेळांची नावं! कदाचित तुमच्या दादा-ताईला ती ठाऊक असतील, नाही तर आई-बाबांना तर नक्कीच त्यांची माहिती असेल. या खेळांची नुसती नावं ऐकली तरी ते या खेळांच्या आठवणीत रमून जातील. कारण पूर्वी टीव्ही फारसे नव्हते आणि मोबाइल फोन तर अजिबातच नव्हते, त्या काळातल्या मुलांचे हे आवडते खेळ होते. विशेष म्हणजे, यातले बहुतेक खेळ मैदानी होते आणि त्यांना फारशी साधनंही लागायची नाहीत. सवंगडी जमले की, झाली खेळाला सुरुवात. आजच्या टेक्नोसॅव्ही काळातल्या तुम्हा मुलांना यात काय विशेष, असंच वाटेल, पण त्यात एक गंमत असायची. तुम्हाला या खेळांची माहिती नसल्याने ती गंमतही तुम्ही अनुभवली नसणार. म्हणूनच ती तुम्हाला अनुभवता यावी यासाठी आम्ही यातल्या काही खेळांची माहिती देणार आहोत. हे खेळ तुम्ही खेळलात तर तुम्हाला कळेल की, इंटरनेटवरच्या खेळांपेक्षा या अस्सल आपल्या मातीतल्या खेळांमध्ये किती धम्माल असते ती. हो, पण त्यासाठी थोडं मैदानाकडे फिरकायला हवं.. कमीत कमी तुमच्या सोसायटीच्या आवारात तरी.

No comments:

Post a Comment