Friday, February 22, 2019

लेझीम

क्रीडाप्रकार व साधन

क्रीडाप्रकार व साधन. व्यायाम व मनोरंजन अशा दोन्ही उद्दिष्टांनी लेझीम खेळली जाते. ‘लेझम’ या मूळ फारशी शब्दावरून लेझीम शब्द प्रचारात आला असावा. त्याचा मूळ अर्थ तार लावलेले धनुष्य असा आहे. मूळ अर्थ बाजूला राहून आता लेझिमीचा आकार व वजन यांत बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी सु. २१/२ हात लांब बांबू (वेळू) घेऊन त्याला २ हात लांब लोखंडी साखळी धनुष्यासारखी लावून ही लेझीम तयार करीत. बांबूचा लवचिकपणा कमी होऊ नये, म्हणून साखळी अडकविण्यासाठी बांबूला आकडे लावीत असत आणि व्यायाम करतानाच साखळी अकडवीत असत. धनुष्यासारख्या या बांबूचा मध्यभाग जाड करीत. व्यायामासाठी वापरावयाच्या जड लेझिमीची तार जाड आणि वजनदार असे. लेझिमीचे निरनिराळे हात करून ही मेहनत केली, म्हणजे हातात चांगली ताकद येत असे. हा खेळ खास महाराष्ट्रीय असून पेशवाईच्या पूर्वकाळापासून तो रुढ आहे. गुजरातमध्येही तो खेळला जातो.

लेझीम रचना

हल्लीची लेझीम सु. ३८ ते ४५ सेंमी. (१५ ते १८ इंच) लांब लाकडी दांड्याची असून, त्या दांड्याला दोन्ही टोकांना कोयंडे बसवून लोखंडी कड्यांची साखळी जोडलेली असते. साखळी धरता येण्यासाठी मध्यभागी हाताच्या चार बोटांत बसेल एवढी, १५ सेंमी. (६ इंच) लांबीची, सरळ सळईसारखी लोखंडी मूठ असते. साखळीतील लोखंडी कड्यांमध्ये, नादध्वनी निर्माण व्हावा म्हणून पत्र्याच्या दोन दोन-तीन तीन चकत्या बसवलेल्या असतात. लेझिमीचे वजन अदमासे ०.७८ ते ०.९० किग्रॅ. (१३/४ ते २ पौंड) असते. लेझिमीचा खेळ हा पौरुषयुक्त वीरनृत्याचाही प्रकार आहे. त्यात विविध प्रकारचे नर्तकांचे शारीर रचनाबंध आढळून येतात. नर्तकसमूहांनी लेझीम वाजवत गोलाकार फेर धरून नाचणे, वेगवेगळी उलटसुलट वर्तुळे रचीत पुन्हा गिरकी घेऊन पूर्वपदावर येणे, दोना-चारांच्या रांगा करून संचलन करणे इत्यादी. ह्या सर्व हालचालींमध्ये एक प्रकारची सहजता व डौल प्रत्ययास येतो. या समूहनृत्यांत नर्तकांच्या हालचाली व पदन्यास यांचे खूपच वैविध्य दिसून येते. उड्या मारणे, उकिडवे बसणे, वाकणे, पावले तालासुरात मागे पुढे करीत. लयबद्ध रीतीने मागेपुढे सरकणे इ. अनेक नृत्यमय हालचालींचा त्यात समावेश होतो. लेझीम तालासुरात वाजवण्याच्या क्रियेत नर्तकाचे दोन्ही हात गुंतलेले असल्याने, हातांच्या हालचाली नियंत्रित होतात. लेझीम नृत्याची प्रत्येक हालचाल लेझिमीच्या ठेक्याशी व नादलयीशी सुसंगत रीत्या केली जाते. लेझीम नृत्य हलगी, ढोल, झांजा, ताशा या वाद्यांच्या किंवा आधुनिक काळात बॅंडच्या साथीवर केले जाते. सर्व नर्तकांच्या हालचाली तालबद्ध व एकसमयावच्छेदेकरून होत असल्याने त्यात आकर्षकता निर्माण होते. ग्रामीण देवदेवतांच्या पालख्या, गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सार्वजनिक मिरवणुका, खेड्यातल्या जत्रा, उरूस यांच्यापुढे लेझीम खेळणारे ताफे पाहावयास मिळतात. एक व्यायामप्रकार म्हणून शालेय शारीरिक शिक्षणात त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

लेझिमीचे बडोदा-लेझीम (किंवा हिंदी-लेझीम), घाटी-लेझीम व एन्‌.डी.एस्‌.-लेझीम असे तीन प्रमुख प्रकार आहेत. बडोदा-लेझीम हा सैनिकी द्वंद्वांचे पवित्रे, आक्रमण, बचाव इत्यादींच्या मूळ रूपांचे शिक्षण तालठेक्यावर सामान्यजनांना देण्याचा एक उत्तम प्रकार आहे. तर घाटी-लेझीम व एन्‌.डी.एस्‌. - लेझीम हे प्रकार अधिक तालबद्ध व सामूहिक प्रात्यक्षिकांसाठी सुयोग्य व दर्शनीय आहेत. ताल-ठेक्यासाठी, विविध रचना-आकृतींसाठी घाटी-लेझीम व एन्‌.डी.एस्‌.-लेझीम यांचे संमिश्र प्रकार करून उत्तम प्रात्यक्षिके सादर करता येतात. नवव्या एशियाडमध्ये (१९८२, दिल्ली) महाराष्ट्राने आपल्या प्रांताचे प्रतीक म्हणून ४०० खेळाडूंचे लेझिमीचे सर्वोत्तम प्रात्यक्षिक दिले होते.

सापशिडी

सापशिडीच्या खेळात काय होतं? शिडी हाताशी आली की आपण झप्पकन वर जातो आणि सापानं गिळलं की दाणकन खाली आदळतो ! 

 

 "१३व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या व फाश्याचा उपयोग करून एक खेळ तयार केला. ह्यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार व सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार.शिडीच्या सहाय्याने वर चढणे हे चांगले समजले जाई तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. हा खेळ 'सापशिडी' ह्या नावाने अद्यापिही लोकप्रिय आहे." 
 
‘‘सापशिडी हा खूप जुन्या काळातला भारतीय खेळ आहे. त्याकाळी या खेळाला ‘मोक्षपट’ असंही म्हटलं जायचं. सापशिडी तेव्हाच्या काळी मनोरंजनासाठी खेळली जायचीच, पण थोडा वेगळा दृष्टिकोनही या खेळात होता. ‘‘पूर्वीच्या काळी सापशिडीच्या पटाच्या बाहेर ही अशी खूप चित्रं काढलेली असायची. देव-देवता, देवदूत, प्राणी, माणसं, पानं-फुलं अशी चित्रं सापशिडीच्या आजूबाजूला असत.’’ 
पूर्वी सापशिडीचा वापर नैतिकतेचे धडे देण्यासाठीही होत असायचा. म्हणजे आयुष्य हा सापशिडीचा पट आहे, असं मानून हाव, क्रोध, मत्सर, अभिलाषा असे साप आणि सत्कर्म, सदाचार, परोपकार अशा शिडय़ा त्यात डिझाइन केलेल्या असत. चांगलं वागणाऱ्या माणसांना मोक्ष मिळतो आणि वाईट वागणाऱ्या माणसांना सापाच्या तोंडातून खाली येऊन पुनर्जन्म घ्यावा लागतो, अशी काहीशी त्याकाळच्या सापशिडीची शिकवण होती.’’
 ‘‘नंतरच्या काळात मात्र नैतिकतेचे धडे वगळून फक्त साप आणि शिडय़ा असलेले पट दुकानात मिळायला लागले. काही काही देशांमध्ये तर शाळेतल्या मुलांना अंक मोजणं आणि इंग्लिश शब्द शिकवण्यासाठीसुद्धा सापशिडीचा वापर केला जातो. सापशिडी खेळताना अनेकदा पटावर पुढे जाऊन पुन्हा मागे यावं लागतं, त्यामुळे ‘बॅक टू स्क्वेअर वन’ असा शब्दप्रयोगही सापशिडीमुळे रूढ झाला.

भोवरा

हा खेळ मूळचा भारतीयच आहे. भारतासहित चीन व जपानमध्येही तो खेळला जातो. तो शंक्वाकार असून त्यात लोखंडाचं एक निमुळतं टोक असतं, त्याला आरू असं म्हणतात. पूर्वी भोवरा लाकडाचा आणि मोठ्या आकाराचा असायचा. आता तो प्लॅस्टिक किंवा फायबरचाही असतो.
प्राचीन ग्रीक-रोमन काळातही भोवऱ्याचा उल्लेख सापडतो. यूरोपात चौदाव्या शतकानंतर भोवऱ्याचा वापर आढळतो. जीन व जपानमध्ये भोवरा फार पुरातन काळापासून लोकप्रिय आहे. भोवरा एका टोकाला गोलसर जाड आणि दुसऱ्या टोकाला निमुळता असतो. निमुळत्या टोकात लोखंडाची तार बसवितात. तिला ‘आर’ आणि डोक्यावरील बोंडाला ‘मोगरी’ म्हणतात. निमुळत्या भागावरून गुंडाळलेली दोरी घसरू नये म्हणून त्यावर काप किंवा खाचा असतात. मोगरीपासून कापापर्यंत भोवरे रंगवून आकर्षक करतात. निमुळत्या बाजूकडून दोरी गुंडाळल्यानंतर दोरीचे एक टोक हातात पक्के धरून झटका देऊन तो आरेवर पडेल अशा रीतीने दोरीला ओढ देत फेकला, म्हणजे भोवरा फिरू लागतो. या दोरील ‘जाळी’ आणि भोवऱ्याच्या फिरण्याला ‘नाद’ असे म्हणतात.
हा खेळ खेळण्याचे काही नियम नाहीत, पण तो खेळायला तुम्हाला भरपूर सरावाची आवश्यकता असते. तसंच हा खेळ काळजीपूर्वक खेळावा लागतो, कारण भोवरा फिरवताना हातातून सुटला तर तो लागून दुखापत होण्याचीही शक्यता असते. भोवरा कितीही जण मिळून खेळू शकतात. अगदी एकटयानेही तो खेळता येतो.
भोवरा खेळताना डाव्या हातात तो पकडून त्यावर उजव्या हाताने भोव-याला घट्ट दोरा गुंडाळायचा. दोरा निमुळत्या बाजूकडून गुंडाळत जायचं. दो-याचं एक टोक हलकेच भोव-याच्या डोक्यापर्यंत खेचून त्यावर अंगठा ठेवून, भोवरा उजव्या हातात अलगद पकडायचा. उजवा हात खांद्यापर्यंत वर नेऊन जोरात झटका देऊन भोवरा सोडायचा. भोवरा जमिनीवर पडून टुणकन एखादी उडी मारून गरगर फिरतो. सुरुवातीला वेगाने फिरणारा भोवरा थोडा वेळ फिरल्यानंतर मंदावतो. भोवरा खेळायला जास्त जागा लागत नाही. भोवरा हातावर घेऊन खेळण्याचीही पद्धत आहे. त्यात इजा होण्याचीही शक्यता असते, म्हणून आपल्याला जमेल तसा तो खेळावा. आपणच काढलेल्या वर्तुळात भोवरा टाकायचा. अट अशी की, त्या वर्तुळाच्या आतच तो फिरायला हवा. तो वर्तुळाबाहेर गेला की बाद झाला.
हा खेळ खेळण्याची आणखी एक पद्धत म्हणजे भोवरा फिरवताना, ज्याचा सर्वप्रथम फिरेल तो जिंकला आणि ज्याचा नंतर फिरेल तो हरला. हरलेल्या सवंगड्यानं आपला भोवरा एका गोल रिंगणात ठेवायचा. नंतर दुस-या भोव-यानं त्याला आस देत तो ठरवलेल्या हद्दीपर्यंत घेऊन जायचा. (आस म्हणजे भोवरा फिरवून तो हातात घ्यायचा, फिरत असतानाच तो खाली ठेवलेल्या भोव-याला मारायचा) भोवरा हद्दीच्या रेषेच्या पलीकडे गेला तर आस देणारा जिंकला, जर त्याला आस देता नाही आली तर ती संधी दुस-याला मिळते. या प्रकारे भोवरा खेळायला तुम्ही कुशल भोवरेबाजच असावे लागता.

सागरगोटे/गजगे

हा मुलींचा खेळ समजला जातो.

दोन व त्यापेक्षा अधिक कितीही मुली हा खेळ खेळू शकतात. या साठी सागरगोटे लागतात. हे एका झाडाला येतात. सागरगोटयाच्या झाडाला काटे असतात. म्हणून तयार बाजारातून आणावे. (नसल्यास वाळूतील सारख्या आकाराचे गोलाकार गुळगुळीत बोरा एवढे दगड ही चालतील) कमीत कमी ५ गोटे हवेत. दोन्ही जणी समोरासमोर बसून हा खेळ खेळायचा (अधिक मुली असल्यास गोलाकार बसावे) एका हाताने पाची सागर गोटे जमिनीवर हळूच पसरवून टाकायचे शक्यतो एकमेकाला चिकटू नयेत चिकटल्यास दुस-या मुली कडून मुंगीला वाट मागावी हळूच सरकवून अलग करावे. एक सागरगोटा उंच हवेत उडवून तो खाली येण्याच्या आत जमिनीवरचा दुसरा एकच सागर गोटा उचलावा व उंच उडवलेला सागरगोटा झेलावा असे झेलत उचलत जावे. उचलतांना झेलतांना सागरगोटा खाली पडला तर डाव गेला. नाहीतर पुन्हा खेळायचे पहिल्या डावाला एरखई म्हणतात, दुस-या डावाला दुरखई, तिस-याला तिरखई, चौखई असे. दुस-या वेळी एक सागरगोटा उंच फेकल्यावर खालील दोन सागरगोटे एकदम उचलायचे. तिरखईला ३ उचलायचे अशात-हेने पहिली फेरी संपते. दुस-या फेरीत 'उपली सुपली' करायची म्हणजे सर्व सागरगोटे दोन्ही हातांनी (ओंजळीने ) हळूच वर उडवायचे व सर्वच्या सर्व हाताची उपली ओंजळ करुन त्यात पकडायचे. यातही ३ प्रकार एकदा एकच हात उलटा करायचा उजवा डावा मग दोन्ही पाच खडे घेतले असल्यास प्रत्येकी पाच वेळा असे करायचे. तिस-या फेरीत 'चिमणी कोंबडयाची चोच' करायची म्हणजे दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुफुंन अडकवायची आणि फक्त दोन्ही हाताचे पहिले बोट सोडून त्या दोन बोटांनी खाली टाकलेले खडे एक एक करुन ओंजळीत टाकायचे. सर्व खडे टाकुन होईपर्यंत एकही गोटा खाली पडता कामा नये. चौथ्या फेरीत 'हंडी चढवायची’ म्हणजे पाच खंडयापैकी दोन दोन खडे जोडून जमिनीवर ठेवायचे व पाचवा खडा उंच फेकून, दोन खडयांची जोडी उचलायची व वरचा खडा झेलायचा नंतर परत एक खडा वर फेकून जमिनीवरची दुसरी जोडी उचलायची व पहिली जोडी जमिनीवर ठेवायची. असे लागोपाठ सतत ५० ते १०० वेळा (जेवढयाची हंडी ठरली असेल तेवढे) करायचे म्हणजे ती जिंकली. ऐरखई- दुरखई करतांना डाव गेला तर दुस-या भिडूला खेळू द्यायचे व पुन्हा आपला नंबर आला की पुढील डाव खेळायचा. सर्व फे-या जिच्या लवकर पु-या होतील ती जिंकली. एकदा सवय झाली की खडे ५-७-९ असे वाढवता ही येतात.

चोरचिठ्ठी

उन्हाळा म्हटलं की, आपल्याला घरी बसून बैठे खेळ खेळणं जास्त सोयीचं वाटतं. कारण उन्हात धावपळीचे खेळ खेळून आपण थकून जातो. अशा वेळी चोरचिठ्ठी हा खेळ खेळायला छान आहे. या खेळाची आणखी एक गंमत म्हणजे या खेळात कोणताही खेळाडू बाद होत नाही. या खेळात राजा, राणी, प्रधान, चोर, पोलिस असे पाच जण असतात आणि प्रत्येकाला गुण असतात. म्हणजे राजाला पन्नास, राणीला चाळीस, प्रधानाला तीस, पोलिसांना वीस आणि चोराला दहा गुण. या खेळाची सुरुवात करताना वहीचं एक कोरं पान घ्यायचं. त्या पानाच्या पाच चिठ्ठय़ा करायच्या आणि पानाच्या प्रत्येक चिठ्ठीवर राजा, राणी, चोर, पोलिस, प्रधान अशी नावं लिहायची. सर्व मुलांनी गोल करून बसायचं आणि त्या गोलात कोणी एका मुलाने या सगळ्या चिठ्ठय़ा एकत्र करून उडवायच्या. प्रत्येक मुलाने आपापली चिठ्ठी उचलायची. चिठ्ठी उघडून पाहिल्यावर त्या चिठ्ठीत जे नाव असेल ते कोणालाही सांगायचं नाही. ज्या मुलाच्या हाती ‘पोलिस’ असं लिहिलेली चिठ्ठी येईल, त्याने मात्र ते सगळ्यांसमोर जाहीर करायचं. नंतर पोलिस असलेल्या खेळाडूने ‘चोर’ कोण आहे हे ओळखायचं.
चोर ओळखायला त्याला कोणीही मदत करायची नाही. प्रत्येक खेळाडूने इशारे न करता गुपचूप बसून राहायचं. जर त्या खेळाडूने चोराला बरोबर ओळखलं, तर तो जिंकला आणि चुकीचा चोर ओळखला तर तो हरला. तो जिंकला तर त्याला चोर आणि स्वत:चे मिळून तीस गुण मिळतील आणि हरला तर शून्य आणि ते तीस गुण चोराला जातील. या खेळाच्या अशा अनेक फे-या चालतात. पहिली फेरी संपली की, एका कागदावर सगळ्यांचे गुण नोंदवले जातात. मग पुन्हा चिठ्ठय़ा उडवून खेळ सुरू करायचा. हा खेळ तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही खेळू शकता. खेळाच्या शेवटी सगळ्यांचे गुण मोजले जातात, ज्याला सगळ्यात जास्त गुण असतील तो ‘चोरचिठ्ठी’ खेळाचा विजेता बनतो आणि या खेळात चिठ्ठय़ा एकदाच बनवायच्या आणि त्या जपून वापरायच्या. अशाने वह्यांची पानं खराब होत नाहीत.

पिदवणी/खुपसणी

 हा खेळ प्रामुख्याने पावसाळयात खेळला जातो. पाऊस पडत असला कि अंगणात इतर खेळ खेळता येत नाही तर पण थोडा पाऊस थांबला की हा खेळ खेळता येतो. जमीन ओलसरच असावी. यासाठी दोन किंवा कितीही मुले चालतात.एक लोखंडाची छोटीशी ६ ते ९ इंच लांबीची काडी(कांब) घ्यायची. बारीक गजाचा तुकडा, किंवा मोडक्या छत्रीची लहानशी काडीही चालेल. पण कडक हवी.या काडीस जमिनीत खुपसण्यासाठी निमुळते टोक हवे.

खेळ कसा खेळावा

एकावर राज्य द्यायचे व इतरांनी ती काडी ओल्या जमिनीत/चिखलात रुतवायची. अशी फेकायची की जमिनीत खोचली गेली पाहिजे. पडली तर डाव गेला. अशी काडी रुतवत फेकत लांब जायचे डाव जाईपर्यंत सर्व भिडूंनी लांब लांब न्यायचे व नंतर राज्य असलेल्या मुलाने तेथपासून मूळ ठिकाणापर्यंत लंगडी घालत यायचे. जास्त मुले असली की खूप लांब दमछाक होते म्हणून याला पिदवणी म्हणायचे. कांब जमिनीत खुपसायची म्हणून या खेळास खुपसणी असेही म्हणतात.एखाद्या खेळात दमवणे याला 'पिदवणे ' असे म्हणत असत.

भातुकली

पूर्वीच्या काळी म्हणे संसार नावाची एक गोष्ट होती. असे कसे म्हणता ती आजही आहे. पण, त्या संसाराची गोष्ट काही औरच होती. हा संसार म्हणजे तुमच्या सारख्या चिमुकल्यांची एक भातुकली. ही भातुकली काय? असा प्रश्न आजच्या पिढीतील कित्येक मुलांना पडत असतो. भातुकली म्हणजे तुमच्या आजी- आजोबांच्या, आई-वडिलांच्या पिढीचे बालपण. मे महिन्याच्या सुट्टीत मांडलेली प्रत्येक घराच्या अंगणात मांडलेली ही भातुकली म्हणजे एकोप्याने मांडलेल्या संसाराचे प्रतीक होती.

लग्नात तयार होणारी नवरी तिच्या लग्नाचा घाट, घरात पाहुणे मंडळी आल्यानंतर केलेला चहा-पानाचा कार्यक्रम अशा वेगवेगळ्या सवयीचे ते प्रतीक होते. तांब्यांच्या आणि पितळेच्या हंडा व कळशी, चिनी माती किंवा प्लास्टिकचा कप-बशीचा सेट, छोटे-छोटे कुकरचे डबे, इवलेसे चमचे, झारे, डाव, छोटासा गॅस आणि सिलिंडर, छोटासा कुकर, छोटी-छोटी पातेली, छोटंसं जातं आणि उरलेली छोटी-छोटी रंगबिरंगी लाकडी भांडी. याशिवाय कोणाकडे फ्रीज तर कोणाकडे पत्र्याचे कपाट या सर्व गोष्टी तुमच्या खेळण्यात कधी आल्यात का? नाही ना?

याचे कारणही तसेच आहे, कारण या भातुकलीची जागा आता बार्बी गर्ल आणि रेसिंग कारने घेतली. मातीच्या भांडय़ापासूनची बनलेली खेळणी खेळण्यात जी मज्जा आहे, ती या रेसिंग कारमध्ये नाही.